ALL INDIA RANK - ओळखीच्या (आयडेंटिटीच्या) शोधाचा प्रवास

         

         मानवी जीवनाची अंगभूत मर्यादा ही ओळखीच्या (आयडेंटिटी) शोधात वाहत जाण्याची आहे. स्वतःची काहीतरी ओळख असावी यास्तव निरंतर संघर्ष करण्याची प्रेरणा ही, 'तुझे माणूस म्हणून अस्तित्वच नाही', हे सतत बिंबवण्यातून येते. नव्वदीच्या दशकात मध्यमवर्गाला या ओळख निर्मितीत गुंतवणूक करण्यात खूप रस होता. ज्यातून आकाराला आली कोटातील एक पूर्ण नवीन दुनिया, जिच्या भाषेत तुमची ओळख ही फक्त मानवी क्षमतेच्या परिपूर्ण वापरातून तुम्हाला प्राप्त झालेल्या ऑल इंडिया रॅंकवरुन ठरत असे, जे काही अंशी आज देखील सुरू आहे. पण ही ओळखच सर्व काही आहे का? या ओळखीच्या अलीकडे आणि पलीकडे नेमके कोणते द्वंद्व आहे? कुटुंब/पालक यांच्यासाठी या ओळख प्राप्तीचे साधन असणार्‍यांना नेमके खरंच ते करायचे असते का? ज्या वयात स्व बद्दल काडीचीही माहिती नसते, तिथे आकडेवारीत ओळख शोधणे काय असू शकते? यासर्व प्रवासाचा आणि आयडेंटिटी क्रायसीस धांडोळा घेतलाय All India Rank च्या लेखक-दिग्दर्शक वरुण ग्रोव्हरने.


        आपण नेहमी शिक्षणाचे महत्त्व ऐकत असतो, त्या महत्त्वाच्या जाणिवेतून अनेक जण शिक्षण मिळविण्यासाठी अत्यंत कष्टही घेत असतात. पण आपल्या शिक्षण पद्धतीत वाढत गेलेल्या स्पर्धेत या शिक्षणाचे मूलभूत तत्त्व कुठेतरी हरवत गेलेले आपल्याला दिसून येते. मुळात स्पर्धा काय या सर्वाचे मूळ नाहिये, तर आवडत्या विषयात-शाखेत स्पर्धा करण्याचे न मिळणारे स्वातंत्र्य, या प्रश्नाला आणखी गुंतागुंतीचे बनवून 'सब अच्छी बाते हे किताबो में...' बोलायला भाग पाडते. ऑल इंडिया रॅंक तस पहिला गलं तर आयआयटीची तयारी करणार्‍यांचे भाव विश्व मांडताना दिसतो. पण तो फक्त तिथे थांबत नाही, त्यापुढे जाऊन तयारी करणाऱ्यांच्या कुटुंबियांची यासर्व गोष्टींकडे बघण्याची दृष्टी देखील मांडण्याचा प्रयत्न करतो.


        अगदी जीवनातील नियंत्रणापासून सुरू झालेला प्रवास, आपल्याला कधी बोलण्याच्या/व्यक्त होण्याच्या हक्कापर्यंत घेऊन येतो, हे समजत ही नाही. एका प्रसंगात चित्रपटाच्या नायकाला त्याच्या स्वप्ना बद्दल विचारले जाते, तर तो ते व्यक्त करण्यात असहज होतांना दिसतो. त्याक्षणी आपल्याला स्वप्नच नसणे किती भितीदायक असू शकते, याची जाणीव होते. अर्थात हे स्वप्न असणे आणि ते बोलून दाखविण्याची चॉईस/पर्याय नसणे आणि त्यातून आलेली संकुचित वृत्ती याचा कार्यकारणभाव आपल्याला स्पष्ट अधोरेखित होण्यास वेळ लागतो. एखाद्याला समोरच्याने 'तू खूप भावनिक आहेस', असे बोलणे आणि त्यावर 'चला मी काही तरी आहे', असं उत्तर येणे आपल्याला हलवून ठेवणारे आहे. वरुणचे काम बघत असणार्‍यांना या सर्वाचा थोडा कमी धक्का बसू शकतो, पण इतरांसाठी ते नक्कीच खूप त्रासदायक ठरू शकते.

        पण खरंच 'ऑल इंडिया रॅंक' ही टिपिकल आयआयटी वाल्या वेब सिरीज/चित्रपट वर्गवारीत फिट बसते का? तर मला तरी वाटत नाही, कारण ती आता पर्यंत समोर आलेल्या विद्यार्थी केंद्रित मांडणीचा अवकाश विस्तृत करते. ती मांडणी घराच्या अंगणात, पालकांच्या कामाच्या ठिकाणापर्यंत घेऊन जाते. खरतर इतक्या मोठ्या पटावर मांडणी करतांना धरसोड होण्याची भीती असते, पण ती धरसोड काही आपल्याला दिसत नाही. बर्‍यापैकी दोन समांतर गोष्टींना वेळोवेळी प्रासंगिकता आणि प्रतिकात्मकतेने जोडण्याचे काम केल्याने, आपला फोकस काही शिफ्ट होत नाही. विशेष म्हणजे पालकांच्या भावविश्वात वडील आणि आई यांच्या भूमिकांना ज्याप्रमाणे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न झालाय, तो नक्कीच कौतुकास्पद आहे.


        आई आणि वडीलांशी बोलतांना मुलाचे दोन वेगळे रूप आपल्याला दिसून येते, जे की जवळपास सर्वांना अनुभवलेले असेल. विशेषतः मुलगा आणि वडील यांच्या संवादातील कोरडेपणा, भावनांना व्यक्त करतांना दोघांत येणारी संकुचितता आपल्याला त्या नात्यातील सत्ता संरचना अधोरेखित करण्यास पुरेशी आहे. खरतर हे असे वागणे पुरुषी जडणघडणीचे अपत्य आहे, ज्यात ती वागण्यातील मोकळीक नाहिये. याप्रकारची अडचण अनेक पिता-पुत्रांनी अनुभवली असेल, त्यांना ते प्रसंग आत्ममग्न होण्यास भाग पाडतात. मध्यमवर्गीय मोरॅलिटी आणि कौटुंबिक संरचना आपल्याला अश्या अनेक प्रसंगातून दिसून येतात. विशेषतः नव्वदीच्या काळातील कुटुंब व्यवस्था आणि निर्णय प्रक्रिया अनुभवलेल्यांना हा चित्रपट त्यांच्या भूतकाळात घेऊन जातो. ज्यात तुम्ही स्वतःला नायकाच्या जागी बघायला सुरवात करता. 


        चित्रपटाचा हा प्रवास आपल्याला प्रत्येक पात्राशी जोडण्याचा प्रयत्न करतो, त्यात काही प्रसंग का आले असे प्रश्नही निर्माण होतो. कदाचित सध्याच्या काळातील घटनांना नवदीच्या काळात नेण्याचा देखील तो प्रयत्न असू शकतो. अगदी अंगावर येईल असेही काही घडत नाही, पण ते नसते तर जास्त फरक पडला नसता, असेही काहीवेळा वाटून जाते. अर्थात काहीवेळा आपण प्रेक्षक म्हणुन देखील प्रत्येक गोष्टीत अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो, त्याचीही ती मर्यादा असू शकते. पण यासर्व शोधाचा शेवट खूपच अर्थगर्भ आहे, एवढे मात्र खात्रीने सांगता येते. वरुण ने एका मुलाखतीत सांगितलेले की त्याला शेवट बदलावा असा काहीवेळा सल्ला देण्यात आला. पण त्याने तो काही बदलला नाही! आपल्याला चित्रपटगृहातून बाहेर पडतांना त्याचा निर्णय किती योग्य होता, याची नक्कीच जाणीव होते. 

        तर इतके सगळे बोलून झाल्यावर आपल्याला प्रश्न पडत असेल की, 'ऑल इंडिया रॅंक' नेमका आहे तरी कसा? तर ऑल इंडिया रॅंक एका चांगल्या दिग्दर्शकाचा पहिला चित्रपट आहे. ज्यात खूप अर्थपूर्ण आणि मधुर गाणे असून, त्याची अद्भूत प्लेसमेंट झाली आहे. जवळपास सर्वच कलाकारांनी उत्तम काम केलेला, कोटाच्या मुळापर्यंत जाऊन प्रत्येकाच्या आयडेंटिटीला गवसणी घालून, प्रत्येक जण स्वतःची आयडेंटिटी कशात शोधू शकतो, याची उत्तम मांडणी करणारा चित्रपट आहे, जो सर्वांनी एकदातरी बघितला पाहिजे.

 © ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ जाधव 

Comments