महात्मा काल, आज आणि उद्या...!



     महात्मा गांधी यांना आजच्या दिनी मारले होते, पण खरच गांधी मेले आहेत का? कारण गांधीचे शरीर मरणे आणि विचार मरणे यात खूप अंतर आहे. गांधी शरीराने मेले आहेत पण विचारांनी नाही असे आपण नेहमीच बोलतो. पण खरंच तसे आहे का? याच साठी हा ब्लॉग आहे. वाचा आणि विचार करा.

      गांधी हे आज देखील दिसतात आम्हाला त्या आंदोलनकर्त्यांत, जी देतात गुलाब आंदोलनात बंदोबस्तातावर असणार्
या पोलिसांत. गांधी दिसतात आम्हाला वाहतूक नियम तोडणाऱ्यांना गुलाब देणार्या पोलिसात. गांधी आंदोलनातील त्या विविध कलात्मक पोस्टर मधून डोकावताना दिसतात. गांधी हे दिसतात आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, मंत्रालयासमोर बसलेल्या उपोषणकर्त्यांत, नर्मदा बचाव आंदोलन कर्ते पाण्यात उभे असतात त्यात, तामिळनाडूच्या शेतकर्यांच्या आंदोलनात, नाशिकच्या शेतकऱ्यांच्या पदयात्रेत. गांधीची प्रतिमा आणि विचार दिसतो आम्हाला शांततापूर्ण आंदोलनांत.

     पण गांधी मरताना देखील दिसतात अनेक ठिकाणी. दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश & कलबुर्गी यांना मारले तेव्हा गांधींना मारल्याची अनुभूती येते. गांधी मारले जातात सत्तेच्या केंद्रीकरणात, धार्मिक & जातीय द्वेषात. खाण्याच्या पद्धतीवरून जेव्हा जातो झुंडबळी तेव्हा गांधी मरताना दिसतात. माध्यामातून येणाऱ्या #FakeNews गांधीच्या सत्याच्या मार्गाला दररोज सुरुंग लावतात. गांधीची अंत्योदय ही फक्त राहिली आहे एक संकल्पना. प्रत्येक हिंस्र आंदोलन जीव घेत आहे गांधींचा. राळेगण, हिवरेबाजार असे निवडक गावे सोडली तर भकास गावे गांधींचे ग्रामस्वराज्यचे स्वप्न मारताना दिसतात.

      गांधी आजही जिवंत आहेत विचारूपी, पण दररोज विचाररुपी गांधी मारेल जात आहेत हे देखील तितकेच सत्य आहे. ही हत्या थांबण्यासाठी गांधींचा चष्मा हा अस्वच्छेते सोबतच इतर सामाजिक अपप्रवृतीना बघण्यासाठी वापरू, त्या नष्ट करण्यासाठी प्रयत्न करू हीच असेल त्या युगप्रवर्तकाला खरी श्रद्धांजली.

Comments

Post a Comment