विश्वबंधुत्वाचे उद्गाते...!

       
  
        ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस ! वारकरी संप्रदायाच्या रचनेचा पाया ज्या ज्ञानदेवांनी रचला त्यांचा आज संजीवन समाधी सोहळा आहे. ज्ञानदेव हे भारतीय समाजव्यवस्थेच्या गुंतागुंतीना आणि त्यातील गुणदोषांना सामोरे जाणारे एक महान संत आहेत. जन्माने तत्कालीन वर्णव्यवस्थेत उच्च स्थानी असणाऱ्या वर्गात जन्माला येऊन देखील, त्यांना अनेक वाईट प्रवृतींनी विविध कारणांनी छळले. पण या सर्वाला ते पूरून उरले, त्यांनी यासर्व बिकट परिस्थितीला तोंड देऊन निर्माण केला ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ. 

       ज्ञानेश्वरी ला ग्रंथराज म्हटले जाते, त्याच्या मागे एक कारणमीमांसा आहे. पण खरच ज्ञानेश्वरी आहे तरी काय? तर ज्ञानेश्वरी प्रतिक आहे "ज्ञानाच्या सार्वत्रिकीकरणाची", सर्वाना हक्काने ज्ञान घेण्याचा अधिकार देण्याची, जातीचे आणि वर्गांचे बंधन झुगारून देणार्‍या ज्ञानेश्वरांच्या श्रेष्ठत्वाचे. ज्ञानेश्वरी आम्हाला वाईटाविरूद्ध ठामपणे उभे राहण्याची प्रेरणा देते. ज्ञानेश्वरी मराठी भाषेला वैभवशाली बनवते. ज्ञानेश्वरी देते प्रत्येकाला अधिकार ज्ञान प्रवाहात सामील होण्याचा. ज्ञानेश्वरांनी खऱ्या अर्थाने संस्कृत या भाषेवर असणाऱ्या जन्मजात एकाधिकारशाहीला पहिले आव्हान उभे केले. त्यांनी संस्कृत मधील गीतेवर ज्ञानेश्वरी हा विस्तृत ग्रंथ लिहला. 'ज्ञानेश्वरी' ला मागील वर्षी ७२५ वर्षे पूर्ण झाले आहेत, पण आता पुन्हा ज्ञानेश्वरीला जिज्ञासूंनी वाचावे, अंगिकारावे अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे, कारण विश्वबंधुत्व आणि विश्वकल्याणाचा मार्ग आपल्याला ज्ञानेश्वरी मध्ये नक्कीच सापडेल.


       आज आपण ज्या प्रकारची स्तिथी अनुभवतो आहे, त्यामध्ये आपल्याला सामाजिक घडीला व्यवस्थित ठेव्याचे असेल, तर त्याला वारकरी संप्रदाया शिवाय पर्याय नाही. नुकतेच वाराणसी हिंदू विद्यापीठात मुस्लिम प्राध्यापकाला संस्कृत भाषा शिकवण्याला जो काही विरोध झाला तो हाणून पाडण्यासाठी आज आपल्याला भक्ती चळवळीची गरज आहे. धार्मिक सौहार्द्ध निर्माण करण्यासाठी भक्ती परंपरेने जबाबदारी स्वीकारण्याची ही वेळ आहे. याच सोबत आपल्याला आता सगळ्यात जास्त गरज आहे ती ज्ञानेश्वरांच्या आणि वारकरी संप्रदायाच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाची. वारकरी संप्रदायातील किर्तनकारांना आचारसंहिता असावी याप्रकारची मागणी "आम्ही वारकरी" यासंस्थेच्या माध्यमातून समोर येताना दिसत आहे. ती मागणी ही किती रास्त आहे ते आपल्याला काही "मनोरंजनपर/विनोदी" कीर्तन येकून लक्ष्यात येते. 


           ज्ञानदेवांचे पसायदान तरी काय आहे? ती विश्वबंधुत्वाची प्रार्थनाच तर आहे. पुढील पदाचाच विचार कराना;
दुरिताचें तिमिर जावो । विश्र्व स्वधर्म सूर्यें पाहो । 
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात।। 
दुरित म्हणजे पाप, तिमिर म्हणजे अंधार, पापरूपी अंधाराचा नाश होवो. विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होवो, मग सर्व प्राणिमात्रांना जे जे हवे असेल ते लाभो. असा सरळ अर्थ या पदांचा होतो. आज जग पुन्हा संकुचित विचारांकडे, संरक्षणवादी, उग्र राष्ट्रवादाकडे  वळत आहे. त्यातून जागतिक खेडे, वसुधैव कुटूंबकम या संज्ञा समोर आव्हान उभे राहिले आहे. या सर्वातून मार्ग काढण्यासाठी नव्या पिढीने वारकरी संप्रदाय जवळून जाणून घेतला पाहिजे, अभ्यासला पाहिजे, पुनर्जागरण केले पाहिजे; हीच या संजीवन समाधी सोहळ्याच्या दिनी ज्ञानोबा माउलींना खरी आदरांजली ठरेल. 

@ ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ 

Comments

  1. जो जें वांछील तो तें लाहो ।

    ReplyDelete
  2. Dnyandev2.0 _ well wrote.. problem faced by child Dnyaneshwar & mention of BHU professor tells about the age old mind set of people still prevailing in the so called modern society.. Massage of universal brotherhood has been mentioned very precisely.. keep writing similar blogs..

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर लेख आहे, असच लिहित रहा ✌👍

    ReplyDelete
  4. एकदम उत्तम प्रकारे मांडणी केलीय. ❤️🙏
    वारकरी सांप्रदाय महत्त्व अफाट आहे ,ते लोकापर्यंत पोहचायला हव.
    सध्याच्या विषमतेच्या काळात याची अफाट गरज वाटते मला. वारकरी सांप्रदाय चे अनुयायी योग्य अनुकरण करत नाहीत असं बऱ्याच वेळा जाणवून येते. ते कुठ्तरी बदलायला हव.

    ReplyDelete

Post a Comment