युपीएससी, मराठी माध्यम आणि यश…!


     नागरी सेवा परिक्षेत (युपीएससी) माध्यम निवड हा अत्यंत महत्वाचा आणि कळीचा मुद्दा ठरतोय, यात प्रत्येकाचे स्वतःचे असे एक ठाम मत आहे. दिवसेंदिवस युपीएससीच्या परिक्षेबद्दल ग्रामीण भागात माहिती पोहचली आहे. त्यामुळे  सध्या युपीएससीची परिक्षा मराठी माध्यमातून देणाऱ्यांचा कल वाढत आहे. पण त्यांच्या “यशस्वी होण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे”. शासन मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचं वेळी मराठी माध्यमातून परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गळचेपी होत आहे.

     खरेतर यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत, त्यात महत्वाचे म्हणजे मराठी भाषेत तयारी करणारे विद्यार्थी हे पूर्व परीक्षा उत्तीर्ण करण्यात कमी पडत आहेत. या गोष्टीला कारणीभूत असणारा महत्वाचा घटक देखील माध्यमच आहे, कारण पूर्व परीक्षा ही एकतर इंग्रजी किंवा हिंदी भाषेत द्यावी लागते. बहुतांश मराठी माध्यमातून तयारी करणारे विद्यार्थी हिंदी आणि इंग्रजी या दुविधा मनस्थितीत नेहमीच असतात असे त्यांच्याशी बोलल्यानंतर जाणवते. त्यात युपीएससीची हिंदी, ही मूळच्या हिंदी भाषिकांना देखील त्रासदायक ठरते. अगदी "Steel Plant ला लोहे का पेड़" इतका सुमार दर्जाच्या अनुवाद या प्रश्नपत्रिकेत अनुभवता येतो. त्यामुळे हिंदी पेक्षा इंग्रजी बरी अशी परिस्थिती निर्माण होते. यातूनच प्रादेशीक माध्यमातील विद्यार्थाच्या यशाला पहिली चाळण लागते. 


     मराठी माध्यमातून परिक्षा देणार्‍या उमेदवारांचे यशस्वी होण्याचे प्रमाण कमी होण्यासाठी अजून काही कारणे जबाबदार आहेत, ते खालील प्रमाणे. (यात काही कारणे राहून गेली आहेत, असे तुम्हाला वाटल्यास तुम्ही ते कंमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता.)

१) लिखाणास लागणारा वेळ जास्त आहे. तसेच तो कमी करण्यासाठी लागणाऱ्या आकृत्या, नकाशे, आलेख हे मराठीमध्ये उपलब्ध नाहीत. 

२) मुख्य परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या सराव चाचण्या घेणाऱ्या संस्थांची कमतरता, ज्या आहेत त्यांच्या दर्जा बाबत विद्यार्थ्यांच्या मनात असणारी साशंकता. 

३) निरंतर सराव चाचण्यांचा अभाव, लेखी उत्तर तपासण्या बाबत कालसुसंगततेचा अभाव. 

४) युपीएससीसाठी मराठी माध्यमातून गुणवत्ता पूर्ण अभ्यास साहित्याची कमतरता. यात सर्वात महत्वाचे म्हणजे 'द हिंदू', 'इंडियन एक्सप्रेस' सारख्या विश्लेषण केंद्रित वृत्तपत्राच्या तोडीच्या वृत्तपत्राचा अभाव.  

५) मराठीत विज्ञान, भूगोल, अर्थशास्त्र, तंत्रज्ञान, अंतर्गत सुरक्षा तसेच नीतीशास्त्र या विषयावरील युपीएससी परिक्षाभिमूख अभ्यास साहित्याची कमतरता.

६) मराठी माध्यमातून पूण्यात एक – दोन मार्गदर्शक संस्था सोडल्यास, इतरत्र मार्गदर्शनाची कमतरता.

७) संकल्पनांच्या भाषांतरामध्ये असलेला गोंधळ उदा. honesty, integrity and probity मध्ये सचोटी, प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा हे शब्द नेमके कोणत्या संकल्पनेसाठी वापरायचे याचा गोधळ.  

८) युपीएससी परिक्षेत प्रश्नपत्रिका फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे प्रश्नांच्या आकलनात मर्यादा येतात. त्याचा परिणाम उत्तरात दिसून येतो. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी बहुभाषिक असणे गरजेचे आहे (किमान प्रश्न समजण्यापुरते तरी). 

९) मराठी माध्यमातून परीक्षा देणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती तसेच कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी विपरीत असते. त्यामुळे ते या प्रक्रियेत जास्त वेळ टिकून राहत नाहीत व पर्याय म्हणून राज्यसेवेकडे (एमपीएससी) इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत लवकर वळतात. 

१०) मराठी माध्यम निवडताना, "मराठी मधून चांगले व्यक्त होता येते, यापेक्षा इंग्रजीची भीती" हे कारण बहुतांश विद्यार्थ्यांचे असते.

११) मुख्य परिक्षेत गुण देताना मराठी व इंग्रजी माध्यमात समान पातळी राखली जाते का? याबद्दल साशंकता. त्यामुळे मुख्यपरीक्षा नापास झाल्यावर स्वतःचे मूल्यांकन करण्यापेक्षा परीक्षा माध्यमावर अपयशाचे खापर फोडण्याचा कल.

१२) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (एमपीएससी) आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (युपीएससी) असलेला विरोधाभास, यांमुळे दोन्ही परिक्षांची एकदाच तयारी अशक्य. त्याचमुळे विश्लेषणात्मक अभ्याससाहित्याच्या निर्मितीची कमतरता देखील भासते. याउलट परिस्थिती इतर राज्यांत आहे. उदाहरणार्थ उत्तरप्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा युपीएससी च्या धर्तीवर घेतली जाते, त्यामुळे तेथील परीक्षार्थींना त्याचा फायदा होतो. 


     या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून त्यावर उपाय शोधणे अगत्याचे आहे. त्यासाठी वर नमूद केलेल्या थोड्यातरी अडचणी कमी करता याव्यात म्हणून मराठी माध्यमातून मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्यासाठी https://t.me/IASinMarathi हे टेलिग्राम चॅनेल चालू केले आहे. मराठी माध्यमातून परीक्षा देणार्यांचे यशस्वी होण्याचे प्रमाण वाढण्यासाठी सर्वांना सामूहिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. नाहीतर शासनदरबारी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्या अगोदरच युपीएससीच्या स्पर्धेतून मराठी नामशेष होईल यांत शंका नाही.

@ ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ

Comments

  1. UPSC chi tyari marathitun karnaryasthi apratim lekh

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अरविंद सर....!

      Delete
  2. आमच्यापेक्षा मार्गदर्शन करणाऱ्या संस्थाच अपयशी असल्यासारख्या वाटतात . टवटवीत , प्रफुल्लित , प्रेरणात्मक , स्फूर्तीदायक वाटत नाहीत . #भाषा

    ReplyDelete
    Replies
    1. चुक फक्त एका बाजूने नाहीये, हे मी या प्रक्रियेत राहून काही टप्पे पार केल्या नंतर विश्वासाने सांगू शकतो. दुसरे म्हणजे नागरी सेवा परीक्षा ही ६०% तुमच्या बाजूने आणि २०% सुरवातीचे क्लास तर २०% टेस्ट सिरींज यांचे एकत्रित गणोत्तरावर अवलंबून आहे. भाषे संदर्भात बोलायचे झाल्यास वस्तुस्थिती मांडण्यासाठी लिहलेला आहे हा ब्लॉग प्रेरणा देण्यासाठी नाही. सत्य परिस्थिती अशीच असते थोडी निराशाजनक ती आपल्यावर असते कशी स्वीकारायची.

      Delete
  3. थोडं विषय सोडुन ,पण त्या अनुषंगानेच .,"खरंतर बर्याच अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना आपली आवड ,क्षमता व गती यांचा अंदाज योग्य कालावधीत घेता येत नाही, व केवळ प्रेरणादायी ,भारलेली भाषणं ऐकुन हा स्पर्धा परीक्षा भवसागर तरणं मग कठिण जाते ."

    ReplyDelete
  4. .सर एक या अनुषंगाने मला एक प्रश्न उपस्थित करावसा वाटतोय कारण बहुतेक मराठी माध्यमातुन upsc परीक्षेची तयारी करताना मुख्य परीक्षा हि मराठी माध्यमातून देता येते पण जर वैकल्पिक विषय जर science चा असेल तर उदा. botany ,zoology, psycology...तर मुख्य परीक्षा मराठीत आणि वैकल्पिक इंग्रजीत ....मग मुख्य परीक्षा माध्यम मराठी आणि वैकल्पिक परीक्षा इंग्रजी माध्यम असं घेता येत का ?

    ReplyDelete

Post a Comment