अभिजात मराठी - बोलीभाषा आणि ज्ञानभाषा

 



जगात जवळपास ६००० भाषा वापरात आहे, त्यात मराठी भाषा दैनंदिन वापराच्या बाबतीत १५ व्या क्रमांकावर आहे. भाषा हे संस्कृतीचे प्रतीक असते, त्या संस्कृतीचे महत्वाचे गुण आपल्याला त्या भाषेत उतरताना दिसतात. मराठी संस्कृतीचा सर्वांना सामावून घेण्याचा गुण मराठी भाषेत देखील दिसून येतो, गुजराती, प्राकृत, संस्कृत, फारशी, फ्रेंच, पोर्तुगीज, पर्शियन, अरेबिक या सर्वच भाषांमधील शब्द मराठीत आले आहेत. जसे बटाटा, तंभाखू, पगार हे पोर्तुगीज; कामगार, गुन्हेगार हे फारशी शब्द. 


या सर्वसमावेशक मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी साहित्य परिषदा, महामंडळे,सरकार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेतच. पण त्याच बरोबर हे देखील नमूद करावे वाटते मराठी भाषा टिकवण्याचे श्रेय हे गाव गाड्यात मराठी भाषेतून संवाद साधणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला देखील जाते.


भाषिक इतिहासा बद्दल बोलायचे झाल्यास, मराठी भाषिक अस्मितेचा पहिला ध्वज ज्ञानेश्वरांनी फडकावला,

तीरे संस्कृताची गहने।

तोडोनि महाठिया शब्दसोपाने॥

रचिली धर्मनिधाने। श्रीनिवृत्तीदेव॥

असे अभिमानाने सांगत ज्ञानगंगेच्या आणि सारस्वताच्या प्रवाहाचे तीर तोडून त्यांनी शब्दसोपान उभे करून मराठीची बांधणी केली.


पुढे एकनाथांनी ‘संस्कृत भाषा देवाची तर प्राकृत काय चोरापासूनी झाली काय,’ असे ठणकावून विचारत मराठीचा अभिमान जागृत ठेवला. संस्कृत ही काही परकी भाषा नव्हती, तरी तिचा पगडा मोडून काढत ज्ञानदेवांना मराठीची शब्दसृष्टी उभी केली. कारण संस्कृत ही तत्कालीन परिस्थितीत वर्चस्वाचे प्रतीक होती. भाषा आणि बोलीभाषा या संदर्भात भरपूर काही आज बोलले जात आहे. त्याच संदर्भात भाषा संशोधक गणेश देवी यांनी केलेल्या संशोधनानुसार, १९६१ मध्ये भारतात ११०० भाषा बोलल्या जात होत्या. गेल्या ५० वर्षांत त्यातील ३०० बोलीभाषा संपुष्टात आल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात ५६ बोलीभाषा बोलल्या जात होत्या. (स्त्रोत: संत साहित्याचे अभ्यासक लेख, डॉ. रामचंद्र देखणे).


संत साहित्यात देखील बोलीभाषे संदर्भात वाचायला मिळते. नामदेव महाराजांच्या एका अभंगात असा उल्लेख येतो की 'छप्पन्‍न भाषेचा केलासे गौरव। भवार्णवीं नाव उभारीली॥’. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्‍वरीसारख्या ग्रांथिक प्रबंध रचनेत प्रमाणभाषेबरोबर 56 बोलीभाषांना स्थान दिले. या सर्व बोलीभाषा मराठीच्याच होत्या. मराठीच्या मालवणी, आगरी, कोकणी, अहिराणी, मराठवाडी, आदिवासी, वर्‍हाडी आदी बोलीभाषा आहेत. आपण या सर्व बोलीभाषा अधिक पक्क्या केल्या, तर तो मराठी भाषेचा भक्‍कमपणाचा पाया होऊ शकेल. बोलीभाषेचे संवर्धन करणे हा प्रमाण मराठी भाषेच्या संवर्धनाचा पाया होऊ शकतो. पण आपल्याला बोलीभाषेतील चुका काढण्यातून वेळे मिळाला तर हे शक्य होईल ना. 

बोलीभाषा भाषिक आस्वादचे माध्यम आहे, हेच आपण विसरून गेलो आहे. या विसरून जाण्या मागे देखील अनेक कारणे आहेत, त्यावर नंतर कधी तरी लिहिल. तसेच या बोलीभाषांच्या संवर्धनासोबतच आपल्याला महत्त्वाच्या ज्ञानशाखांचे अभ्यास साहित्य सोप्या मराठी भाषेत अगत्याने निर्माण करावे लागेल. कारण भाषा सर्वदूर पोहोचण्यासाठी तिच्या माध्यामातून बहुशाखीय ज्ञानार्जन होणे गरजेचे आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तीच भाषा वृद्धिंगत होऊ शकते जी ज्ञानभाषा ठरेल. मराठीला ज्ञानभाषा बनवण्यासाठी आग्रही राहू, हा संकल्प करून मराठी भाषा दिन साजरा करूया. 

@ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ 

Comments