आत्मपॅम्फ्लेट : सर्वसामान्याची असामान्य आत्मगाथा


    शाळेत असतांना आमची आजी तिच्या जीवनातील खूप गोष्टी सांगायची. तेव्हा मला नेहमी वाटायचे की एक वेबकॅम घेऊन तिचे अनुभव कथन कॅमेऱ्यात कैद करावे, कालांतराने कॅमेरा आला पण आजी नव्हती. तेव्हा खूप दुःख झाले, कारण मला माझ्या आजी इतकी कणखर व्यक्ति आज पर्यंत जवळून बघता आली नाहिये. पण हे आज तुम्हाला सांगायचे प्रयोजन तरी काय असावे बरं... नुकताच प्रदर्शित झालेला आत्मपॅम्फ्लेट हा चित्रपट या गोष्टी पुन्हा आठवण्याच्या मागे आहे. कारण या चित्रपटांने सामन्याच्या भावविश्वाला प्रस्तुत करतांनाच समाजातील क्लिष्ट प्रश्नांना सहज-सुलभ उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. 

    चित्रपटातील 'भावानों' या हाकेतील आपुलकी ही कोणत्याही समान आयडेंटिटीच्या आधारे निर्माण होणार्‍या आपुलकी पेक्षा लाखपट सरस वाटते. अर्थात त्यासाठी तुम्हाला चित्रपटातील नायकाच्या साथीदारांपैकी एक व्हावे लागते. चित्रपटातील 'सृष्टीचा' मागोवा घेतांनाचा प्रवास म्हणजे नव्वदीच्या पिढी समोरील प्रेम 'प्रकरण' या प्रकरणाचा वस्तुपाठच. प्रेम ही भावना, त्यामागील अनंत भावछटा आणि त्याच्या समोर उभे असलेले आर्थिक-सामजिक परिस्थितीचे आव्हाने मांडताना दिग्दर्शक कुठेच कमी पडले नाहियेत. तसेच या सर्व अडथळ्यांतून मार्ग काढतांना नायक आणि त्याचे साथीदार यांचे कष्ट कधीनाकधी आपल्या आजुबाजुला आपण बघितलेले असतात किंवा काहींनी अनुभवलेले देखील, त्यामुळे या आत्मकथेत सगळेच रमून जातात. 

    या रमून जाण्यात आणखी एक धागा आहे. तो धागा म्हणजे आपण आपल्या जीवनातील प्रत्येक महत्त्वाच्या घटनेला जगातील तसेच भारतातील महत्त्वाच्या घटनांशी जोडून बघत असतो. जसे की आपल्या जन्मदिनी आणखी कोना कीर्तीवान व्यक्तीचा जन्मदिन असतो वगैरे. १९९१ जन्म वर्ष असलेल्या आमचे काही मित्र एकमेकांना तू प्री-एलपीजी इरा आहेस की पोस्ट असे गमतीने विचारतात. चित्रपट देखील स्वतंत्र भारतातील राजकीय-सामाजिक-आर्थिक जीवनातील महत्त्वाच्या घडामोडींवर मार्मिक टिप्पणी करत पुढे सरकत जातो. त्यामुळे आत्मपॅम्फ्लेट हा चित्रपट आत्मकथेच्या कक्षा रुंदावतोय आणि आत्मगाथेकडे मार्गस्थ होतोय असे जाणवते. हे करतांना चित्रपटात केवळ त्या घटनांचा ओझरता उल्लेख केला जात नाही, तर त्या घटना हाताळतांना झालेल्या चुका देखील अधोरेखित केल्या जातात, तसेच ती परिस्थिती आणखी चांगल्या प्रकारे कशी हाताळता आली असती ते देखील सांगितले जाते. 

    चित्रपट वर नमूद केल्या प्रमाणे आशयघन तर आहेच, सोबतीला परेश मोकाशीचे उत्कृष्ट पटकथा लेखन आणि आशिष बेंडेचे दमदार दिग्दर्शन आहे. चित्रपटातील कथानकाची आवश्यकता लक्षात घेऊन जास्तीतजास्त वेळ हा बालपणातील कथानकाला दिलाय ही आणखी एक जमेची बाब आहे. तसेच कथानकात स्त्रियांच्या वेगवेगळ्या रूपांना देण्यात आलेले महत्व ठळकपणे दिसून येण्या इतपत आहे. चित्रपटातील जवळपास सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केलाय पण विशेष कौतुक हे बालकलाकारांचे आहे. मला वैयक्तिक पातळीवर सगळ्यात जास्त आवडलेली बाब म्हणजे कथेचे नरेशन, अगदी पियुष मिश्राच्या गँग्स ऑफ़ वासेपूर मधील नरेशनला टक्कर देऊ शकेल असे झाले म्हणालो तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. 

चित्रपट कालावधीच्या दृष्टीने खूप छोटा झालाय असा नाराजीचा सूर येऊ शकतो. तसेच कथानक आणखी वाढवण्याला वाव देखील होता. कारण शेवटाकडे थोडी गडबड झाल्या सारखे वाटते. परंतु आहे त्या मोजक्या  कालावधीतच भरपूर मनोरंजन, प्रचंड तिरकस शाब्दिक बाण आणि सहज-सुलभ प्रबोधन अनुभवायचे असेल तर नक्की बघा तुमची-आमची सर्वांची आत्मगाथा म्हणजेच आत्मपॅम्फ्लेट...

© ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ 

Comments

  1. अत्यंत मोजक्या शब्दात मार्मिक शब्दांकन!!

    ReplyDelete

Post a Comment