पाताल लोकाची कर्मकहाणी




सुदीप शर्मा ची पाताल लोक बघताना आपल्या समाजाच्या सध्याच्या परिस्थिती सोबत एक कनेक्ट जाणवतो. कारण त्यात तुम्हाला अनेक महत्त्वाच्या विषयांवर जरी सखोल मांडणी दिसत नसली, तरी त्या प्रत्येक विषयांवर विचार नक्की करायला लावते पाताल लोक.

यात अनेक प्रतीके, पात्र तुम्हाला प्रश्न विचारत आहेत. त्यागी सारख्या क्रूर पात्राचा इतिहास तुम्हाला त्याच्या बद्दल एकदा तरी सहानुभूतीने विचार करायला लावतो. त्यागी मध्ये तुम्हाला समर्पण भावना दिसते. तोप सिंग तुम्हाला जात वास्तव आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष या कडे घेऊन जातो.

इम्रान अंसारी तुम्ही नकळत किंवा कधीतरी जाणूनबुजून बोललेल्या मुस्लिम द्वेषी वाक्याची आठवण करून देतो. आयुष्यात तुमची ओळख (identity) तुमच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करताना जर तुम्ही कधी अनुभवले असेल, तर तुम्हाला इम्रान अंसारीचे दुःख लवकर समजेल.

कबीर M हा त्याच identity crisis चा भाग आहे. जेथे तुम्हाला तुमची ओळख जीवघेणी वाटते तेथे तुम्हाला कबीर ची मानसिकता भेटते. आज समाजातील भरपूर मोठया वर्गाचे प्रतीकात्मक रूप म्हणजे कबीर. एखांद्याचे नाव सांगणे सुद्धा त्याला जीव घेणे वाटावे हे सामाजिक वास्तव आहे, तेच कबीर आपल्याला ओरडून सांगत आहे. 

चांगला मुलगा बनण्याच्या धडपडी पासून चांगला बाप बनण्याची कसरत करणारा हाथी राम चौधरी हा बाप-मुलगा सुसंवादाचा जीर्ण धागा मजबूतीने मांडतो. विसंवाद हा या नात्यातील खूप मोठा अडथळा आहे. तोच धागा लेखकाने धरला आहे. हाथी राम जेव्हा संजीव मेहरा ची आणि आपल्या मुलाची शाळा एक आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यातील मध्यमवर्गीय महत्त्वाकांक्षा दिसते. ज्यात आज देखील शिक्षण हाच वर्गीय स्थित्यंतराचा दुवा आहे हे अधोरेखीत होते.

याच हाथी राम ला जेव्हा एक रिक्षा चालक म्हणतो की "इमानदार पत्रकाराला स्वस्त हॉटेल ची गरज पडते" तेव्हा तो खूप काही सांगून जातो. पूर्ण सीरिज मध्ये पत्रकारितेच्या विविध आयामांंना मांडले आहे. अमितोष हा ग्रामीण भागातील पत्रकार कोणत्या प्रकारच्या भीती मध्ये काम करतो, हे दाखवतानाच दिल्लीतील पत्रकारांची आलिशान जीवनशैली देखील दाखवली आहे. पत्रकारितेचे हे दोन रूप पाहताना भारताच्या प्रश्नांना इंडियाच्या प्राइम टाइम मध्ये का स्थान मिळत नाही ते देखील स्पष्ट होते.

व्यवस्थेत सर्वांना आपले काम माहीत असते, प्रत्येक जण ते पार पाडतो. ज्याला ते पार पाडता येत नाही किंवा त्याला ते माहित नसते त्याला व्यवस्थित पणे बदलले जाते. डीसीपी भगतच्या भाषेत आपली व्यवस्था well-oiled machinery आहे. हीच गोष्ट व्यवस्थेत काम करणारे मित्र बोलतात तेव्हा नेहिमीच जाणवते.

यात भरपूर जणांचे म्हणणे होते की शेवट वेगळा होऊ शकला असता. तसे वाटण्याचे कारण देखील आहे, आपल्याला दिसत असलेला अन्याय दूर सारण्यासाठी आपण एक नायक/नायिका शोधत असतात. काही तो हाथी राम मध्ये शोधत असतात, काही सारा मध्ये तर काही संजीव मेहरा मध्ये. पण लेखकाने तो शेवट अन्याय दाखवणार ठेवला आहे. कारण पाताल लोकातील लोकांवरील अन्याय हे आपले वास्तव आहे.

@ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ

Comments