विस्मृतीत गेलेले लालबहादूर शास्त्री...


     आज भारताचे दुसरे पंतप्रधान मा. लालबहादूर शास्त्री यांची जयंती, असे अनेक लोक आपल्याला भेटत असतात कि ज्यांचे कर्तृत्व अनेक वेळा झाकोळले जाते त्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. लालबहादूर शास्त्री याचे जीवन देखील याच प्रकारचे एक मूर्तिमंत उदाहरण आहेत. अगदी त्याचा जन्मदिनच घेऊयात तो आहे महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी, त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वावर हवा तितका प्रकाश टाकला जात नाही असे माझे तरी निरीक्षण आहे. पुन्हा पंतप्रधान म्हणून ते असलेला कालखंड हा त्यांच्या अगोदरच्या आणि नंतरच्या पंतप्रधान यांच्या कर्तृत्वाने म्हणा किंवा त्या दोन व्यक्ती केंद्रित राजकारणाने म्हणा झाकोळला गेला. त्यांचा मृत्यू देखी अश्या प्रकारे झाला कि तेव्हा त्यांच्या कर्तुत्वाला आठवण्या पेक्षा तो कसा झाला, त्याचे कारणे काय? या चर्चाच जास्त झाल्या. म्हणून आज हा ब्लॉग लिहण्याचे मुद्दाम ठरवले आहे. काही नवीन आणि चकित करणारी माहित मला भेटली. तुम्ही देखील वाचल्यावर लक्षात येईल नक्कीच. 

      रेल्वेमंत्री असताना अरियालूड येथे घडलेल्या रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून शास्त्रीजींनी तेव्हा राजीनामा दिला होता. एवढी एक घटना असेल किंवा ते लहानपणी कसे पोहत शाळेत जायचे या दोन घटनात शास्त्री जी ना सीमित करून आपण ठेवले आहे असे नाही का वाटत? वस्तुत: स्वातंत्र्य चळवळीत ते महात्मा गांधीजींच्या खांद्याला खांदा लावून लढले आणि अनेक वेळा तुरुंगवासही त्यांनी भोगला. स्वातंत्र्योत्तर नेहरू मंत्रिमंडळात ते रेल्वेमंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उदयोग मंत्री आणि नेहरुंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. इतकंच नाही तर त्यांनी सव्वादोन वर्ष गृहमंत्री म्हणूनही अतिशय कार्यक्षमतेने आणि कणखरपणे काम केलं हे आज किती जणांना आठवते?



    अरियालूड चा विषय निघालाच आहे, तर आता ती नैतिकता आहे का आपल्या धोरणकर्त्यात? प्रत्येक अपयशाचे प्रतीक असलेल्या घटनेत कोणत्या तरी प्रशासनातील कनिष्ठ पदावरील व्यक्तीला जबाबदार धरून आपली नैतिक जबाबदार झटकावण्यात आपण आज धन्यता मानतो. तेव्हा शास्त्रींच्या आदर्श व्यक्तिमत्तवाची आठवण आपल्याला नेहमीच होते. ‘कामराज योजना’ चे पडद्यामागचे खरे सुत्रधार शास्त्रीजी होते हे आपल्याला माहित आहे का? पं. नेहरूंनी आपला वारस म्हणून शास्त्रीजींची केलेली निवड अनेकांना संभ्रमात टाकणारी होती. त्यांच्या स्वभावातील संयमित कणखरता अन् लवचीकता, साधी जीवनशैली, प्रामाणिकपणा आणि निरपवाद चारित्र्य, इत्यादी गुण हेरूनच शास्त्रीजींची निवड नेहरूंनी केली असली पाहिजे. 

       ते जितके शांत आणि संयमी होते तितकेच मुत्सद्दी देखील होते, आंतरराष्ट्रीय राजकारणात किंवा देशांतर्गत घडामोडीत, ज्यानी कोणी शास्त्रीजींना कमी लेखले त्त्यांचा भ्रमनिरासच झाल्याचे दिसते. १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला पराजित करून देखील भारत हे युद्धखोर, साम्राज्यवादी राष्ट्र नसून शांततापूर्ण सहजीवनाचं तत्त्व अंगीकारणारा देश असल्याचा संदेश, ताश्कंद करारावर सही करून शास्त्रीजींनी साऱ्या जगाला दिला. या करारात काश्मीर मध्ये जनमत घ्यावे असा जो आग्रह आयुब खान यांनी लावून धरला होता, त्याला स्पष्ट नकार देऊन करारावर सही करण्यास भाग पाडलं. दुर्दवाने ती त्यांच्या जीवनातील शेवटची घटना होती.


       ‘जय जवान जय किसान’ हे शास्त्रीजींचं घोषवाक्य भारतीय जनतेच्या हृदयसिंहासनावर कायमचं कोरलं गेलं आहे. त्या घोषणेला जरी भारत-पाकिस्तान युद्ध किंवा अन्नधान्याचा तुटवडा हे तत्कालीन कारणे असले तरी; अगदी १८५७ च्या उठावांपासून जी नाळ कोणी हेरली नाही, ती पुन्हा स्थापित करण्याचा प्रयत्न शास्त्रीजींनी केला. दक्षिणेकडील राज्यांना राज्य कारभारात, इतर व्यवहारांत हिंदी भाषेचा वापर नको होता, त्यांना इंग्रजीच हवी होती. शास्त्रीजींनी त्यावर असा तोडगा काढला की, हिंदीचा पुरेसा परिचय जोपर्यंत तेथील लोकांना होत नाही तोपर्यंत या दोन्ही भाषांचा वापर केला जाईल. तशा आशयाचा ठरावही त्यांनी संसदेत मंजूर करून घेतला. त्यामुळे एक मोठंच भाषिक संकट टळलं ! ते आज सांगण्याचे कारण एवढेच कि कोणतेही मुद्दे उकरून काढताना आपल्या पूर्वजांनी ते कसे हाताळले ते बघणे गरजेचे आहे. 


     मास्टर तारासिंग यांनी स्वतंत्र पंजाबी सुभा’च्या निर्मितीसाठी मोठं आंदोलन छेडलं होतं, तथापि त्या वेळी गृहमंत्री असलेल्या शास्त्रीजींनी अतिशय कणखर भूमिका घेऊन ‘स्वतंत्र पंजाबी सुभा’च्या आंदोलनाला मुळीच दादा दिली नाही. अशाच प्रकारची स्वतंत्र ‘द्रविडस्थान’ची मागणी दक्षिणेतील द्रुमक पक्षाने करून त्यासाठी चळवळही सुरू केली होती. पण त्यावेळी देखील शास्त्रीजींनी अण्णादुराईंसारख्या नेत्यांना बजावलं की, या देशापासून फुटून निघण्याचे कोणाचेही मनसुबे यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत आणि ती मागणी संविधानिक पद्धतीने शांत करण्यात आली. 

       हे सगळे आज आठवण्याचे निम्मित जरी शास्त्रीच्या जयंतीचे आहे, तरी हे कर्तृत्व आपण वाचले पाहिजे त्यांना आत्मसात केले पाहिजे. आज आपल्याला शास्त्रींचा व्यक्तित्वातील अनेक सदगुण हवे आहेत. जसे संयमित कणखरता आणि लवचीकता, संवेदनशीलता, साधी जीवनशैली, प्रामाणिकपणा आणि निरपवाद चारित्र्य, मुत्सद्दीपणा जो फक्त आपल्या राष्ट्रहितासाठी वापरला जावा, जबाबदारी स्वीकारण्याचे धाडस, तसेच समाजातील सर्व घटकांवर लक्ष ठेवणारे नेतृत्व. मा. लालबहादूर शास्त्री च्या मृत्यूबाबत वाद घालण्यापेक्षा त्यांच्या जयंतीला त्यांचे गुण आत्मसात करण्याचा निर्धार करून या महापुरुषाला आपण अभिवादन करू. 

@ ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ 

Comments

  1. शास्त्रीजींच्या जीवनपट चा वेध घेणार अप्रतिम लेख

    ReplyDelete
  2. धन्यवाद अरविंद 😊

    ReplyDelete
  3. Shastriji one of my favourite leader who inspired me since childhood. The way in which blog has mentiined important incidents & values, I liked it in all way... Nice written.. keep it up..

    ReplyDelete

Post a Comment