खरच मराठवाडा मुक्त झाला आहे का?

   


     आज १७ सप्टेंबर, आपण मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा करत आहोत. हा दिवस उजाडण्यासाठी अनेकांनी हुतात्मा पत्करले, त्या सर्वांना अभिवादन. निजामाची जुलमी राजवट आणि रजाकाराच्या दमनशाहीला उलथून टाकण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, दिगंबरराव बिंदू, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे यांच्यासह सर्व जनतेने केलेल्या लढ्याला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या धाडसी सहकार्याने हा लढा यशस्वी रीत्या पूर्ण झाला.

     पण आज खरच मराठवाडा मुक्त झाला आहे का? हा खरा प्रश्न आहे. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या मराठवाड्यात खरच पर्यटन किती वाढलेय? यंदा जायकवाडी पूर्ण भरले म्हणुन ठीक, पण या अगोदर मराठवाडय़ाला पाणी देण्यासाठी होणारे रणकंदन आपण विसरू शकतो का? या वर्षी लातूर ला गणेश विसर्जन साठी पाणी उपलब्ध नाही, अश्या बातम्या वाचतांना मराठवाड्याच्या भवितव्याची काळजी वाटवे अशीच परिस्थिती आहे. रोजगाराच्या शोधात मराठवाडय़ातून तरुण बाहेर पडत आहे. बहुतांश शेती ही कोरडवाहू असलेल्या मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या पदरी निराशा आणि त्यातून पुढे आत्महत्या असे पर्याय निर्माण होत आहेत. यावर काही धोरणात्मक आघाडी वर हालचाल होतांना दिसत आहे का?  


         मराठवाडा नेतृत्वहीन होत चालला आहे का? मराठवाडा मुक्तिसंग्राम नंतर त्यातून निर्माण झालेल्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला आपण कधी त्यागणार? मराठवाड्याला लाभलेल्या सांस्कृतिक वारश्याला आपण खरच न्याय मिळवून दिला आहे का? महाराष्ट्रात इतर शहरांमध्ये मेट्रो साठी स्पर्धा चालू असताना, मराठवाडय़ातील सर्वात मोठे शहर असलेल्या औरंगाबाद मध्ये शहर बस सेवा देखील फक्त नावापुरती आहे. बीड सारख्या जिल्ह्याच्या स्थळी अजून रेल्वे पोहचली नाहीये, औरंगाबादचे विमानतळ फक्त नावापुरतं आहे का असा प्रश्न पडतो. 

      भारतीय राज्यघटनेत अनुच्छेद ३७१ नुसार निर्माण करण्यात आलेल्या प्रादेशिक विकास महामंडळाच्या कारभाराबद्दल आपली इतकी अनास्था का? V. M. दांडेकर, विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन प्रादेशिक असमतोल अभ्यास समित्यांच्या सुचना बददल आपण कधी चर्चा करणार आहोत? स्वतंत्र विदर्भाची मागणी करण्यात येत म्हणुन तेथील विकास कसा कमी झाला यावर चर्चा करणारे माध्यमे मराठवाड्या बददल का शांत असतात? फक्त नावाला एक मंत्रीमंडळ बैठक घेऊन काय साध्य झाले आहे यावर श्वेतपत्रीका आपण काढणार आहोत का? अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था अगदी शेवटच्या क्षणी कश्या मराठवाडय़ातून दूसरी कडे गेल्या या बद्दल कोणी आवाज उठवत का? 

       बेरोजगारी, वाळवंटीकरण, शेतकरी आत्महत्या, पाणी तुटवडा, धार्मिक ध्रुवीकरण, जातीय अस्मितांचा वाढता प्रभाव, पायभूत सुविधांचा अभाव या सर्वातून मुक्ती मिळावी, यासाठी सर्वांनी मिळून काम करणे हीच सुजलाम सुफलाम मराठवाड्या साठी आवश्यकता आहे. या सर्व समस्यांतून मुक्तीच मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 

शेवटी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि कृती शील व्हाल एवढीच वाजवी अपेक्षा.

@ ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ 

Comments

  1. मराठवाडा मुक्तीसंग्रामपासून झगडत असेलेल्या मराठवाड्याची विदारक परिस्तिथी सांगणारा लेख

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अरविंद, ही परिस्थिती लवकर सुधारावी एवढीच अपेक्षा.

      Delete
  2. Bhari lihilas... Sadhyach rajkaran & marathwadyatil rajkarani pahun ashat Kahi cgangali news milel as watat nahi.. Till we can hope for the good.

    ReplyDelete
  3. Yes definitely श्रावण, hope is the only remedy 😊

    ReplyDelete

Post a Comment