"दशक्रिया" च्या निमित्ताने…..



      दशक्रिया चित्रपट  येऊन फार दिवस झाले, नेहमी प्रमाणे चित्रपट प्रदर्शना अगोदर विवाद झाला होता. असो तो आताच्या लिखाणाचा विषय नाही, त्यामूळे चित्रपटावर भाष्य  करणे अगत्याचे. नवोदित दिग्दर्शक संदीप भालचंद्र पाटील यांनी मूळ कादंबरी ला योग्य न्याय दिला असे म्हणायला हरकत नाही. दिग्दर्शक स्तुतीस पात्र आहेत हे नक्की, कारण मूळ कादंबरीला रुपेरी पडद्यावर अवतरण्याचे शिवधनुष्य लीलया पेलले गेलंय. फक्त भावनिक ऐवजी प्रबोधनात्मक शेवट अधिक परिणामात्मक ठरला असता, असे वाटते.  

     प्रसिद्ध लेखक बाबा भांड यांची ‘दशक्रिया’ ही कादंबरी सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली, तेव्हा वाचकांचा तिला चांगला प्रतिसाद मिळाला होता. कारण सामाजिक वास्तवाचा एक वेगळाच कोपरा या कादंबरीत उजळून निघाला आहे. लेखक मूळचे औरंगाबाद चे आहेत, त्या परिसरात दशक्रिया विधी साठी प्रसिद्ध असलेल्या पैठण शहराभोवती ही कथा गुंफण्यात आली आहे. कादंबरीचं नाव ‘दशक्रिया’ असलं, तरी दहाव्याच्या विधीपेक्षा या विधीवर एखाद्या गरिबाचं (तो कोणत्याही जातीचा असला तरी) आयुष्य कसं अवलंबून असतं, याचा वेध बाबा भांड यांनी या कादंबरीत घेतला आहे. चित्रपटातील दमदार आशयाला छायाचित्रणाची आणि अभिनयाची तगडी साथ लाभली आहे. तसेच नेसर्गिक सौंदर्याला अचूक पणे टिपण्यात घेतलेली मेहनत उठून दिसते, सध्या दुर्मिळ होत चालेले नदी घाट पडद्यावर इतके सुंदर बघून मन प्रसन्न  होते. 

       खरेतर आपल्याकडे जाती-जाती मधील भेदभावावर खूप लिखाण झालेले आढळते, पण या चित्रपटामध्ये आपल्याला पोटजातींमधील भेदभाव देखील अनुभवता येतो. आज ही जाताच नव्हे तर उपजात देखील लोकांना महत्वाची वाटते, यात काहीही विवाद नाही. फक्त तिचा प्रत्यय तुम्हाला लग्न जमवताना जास्तंच तीव्र स्वरूपात दिसून येतो. जरी जात निर्मितीचा पाया व्यवसाय असला, तरी आता जागतिकारणानंतर अनेक व्यवसाय मध्ये विविध जातीचे लोक एकत्र काम करताना दिसतात. पण त्यामुळं जातीच्या भिंती नष्ट होणे तर सोडा पण पातळ देखील झाल्या नाहीत हीच शोकांतिका आहे. 'जात नाही ती जात' असे नेहमीच म्हटले जाते आणि ते सत्य ठरवण्यासाठी सगळेच आपापल्या परीने थोडाफार हातभार लावत असतात, हे आपण नाकारू शकत नाही. 

     कामावरून आपल्याकडे जात ठरली आणि कामाच्या स्वरूपावरून त्यातील श्रेणिबद्धता ठरवली गेली. यात अग्रस्थानी असणाऱ्या जातीच्या उपजीविकेच्या साधनाशी (व्यवसाय-रूढ शब्दात) निगडित हा चित्रपट असल्या कारणाने, त्या मागील आर्थिक हितसंबंध उलगडण्याचा धाडसी प्रयत्न या चित्रपटात केला गेला आहे. खरे तर जागतिकीकरणाच्या जमान्यात कोणत्याही जातीची आपल्या पिढीजात व्यवसायावर मक्तेदारी राहिली नाही. पण यात काही अपवाद सोडले तर 'तथाकथित' उच्चवर्णीय जातीच्या व्यवसायात कोणी अतिक्रमण केलेले नाही हे कटू सत्य आपणास स्वीकारले पाहिजे. या चित्रपटात शेवटून दुसरा प्रसंग हे सीमोल्लंघन करण्यासाठी उद्दयुक्त करतो. खरेतर चित्रपट तिथे थांबायला हवा होता, त्यातून  हा चित्रपट चांगला ‘परिवर्तनाचा वाटसरू’ ठरला असता. पण ज्या कादंबरी वर हा चित्रपट आधारित आहे ती नव्वदच्या दशकातील असल्यामुळे तत्कालीन परिस्थिती मध्ये हा शेवटचं खूप क्रांतिकारक आहे हे आपण नाकारू शकत नाही. येथे दिगदर्शक स्वतःचं चित्रपटविषयक स्वातंत्र्य (cinematic liberty) घेऊ शकले असते, असो. 

      आपल्याकडे असणाऱ्या पूर्वग्रह दूषित विचारावर, चित्रपटतील गरीब ब्राम्हणाच्या कुटुंबाच्या वास्तवाचे चित्रण आघात करताना दिसते. खरे तर प्रत्येक जातीमध्ये आर्थिक विषमता असते हे आपण सोईस्कर विसरून जातो. कोणीही एका विशिष्ट जातीमध्ये जन्मतो म्हणजे तोंडात चांदीचा चमचा घेऊन येतं नाही. दिग्दर्शकाने आणखी एका महत्वाचा मुद्दा अचूक पणे अधोरेखित केला आहे, तो  म्हणजे जातीय उतरंडी मध्ये जसे-जसे तुम्ही खाली सरकता तसे-तसे महिलांना जास्त स्वातंत्र्य मिळतं जाते. शेवटी भान्याच्या हातून होणाऱ्या कार्याला उस्फुर्तपणे टाळ्या वाजणाऱ्या प्रेक्षकांपैकी कितीजण, जातीचा विचार न करता प्रत्यक्ष जीवनात कृती करतात यातचं या चित्रपटाचे यश दडलंय…

-ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ

Comments

  1. जातीय उतरंडी मध्ये जसे-जसे तुम्ही खाली सरकता तसे-तसे महिलांना जास्त स्वातंत्र्य मिळतं जाते. खूप वास्तविक मांडले आहे.. जात नाही ती जात.. प्रत्येक जण स्वतःला कितीही उदारमतवादी असल्याचे म्हणवून घेत असला तरी एका ठराविक प्रसंगी त्याच्यातील जातिभिमान जागृत होतोच...!! परंतु ही मानसिकता बदलणे अगदी अशक्य नाहीय.. आता असे दशक्रियासारखे आशयघन चित्रपट जेव्हा तयार होतील तेव्हा जनमानसात उमटणाऱ्या प्रतिक्रियाही कालांतराने बदलत जातील... !! बदल हळू का होईना पण होईल..!!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, हो नक्कीच बद्द्लासंदर्भात मी आशावादी आहे, फक्त त्याची गती वाढावी यासाठी हा खटाटोप.

      Delete

Post a Comment