'पूर आवडे सर्वांना'



'दुष्काळ आवडे सर्वांना' अशा शिर्षकाचे पुस्तक लिहणाऱ्या पी. साईनाथ यांना आता नवीन मुद्दा भेटावा, असेच काहीसे महाराष्ट्र शासन आणि विविध राजकीय पक्षांच्या सांगली-कोल्हापूर पुराला देण्यात आलेल्या प्रतिसादावरून दिसून येते. जनतेचा आदेश घेण्यासाठी यात्रा काढणार्‍या सत्ताधाऱ्यांच्या अति उत्साहाला पुराने चांगलीच मुरड घातली. वरूण राजाला देखील इतके बरसण्याचे काय कारण? त्याने थोडे ईशान्येला जाऊन मराठवाडय़ातील लोकांना पाऊस काय असतो ते तरी दाखवले पाहिजे होते. पण त्याला देखील मराठवाड्यात जाण्याचा कंटाळा आला असावा अगदी शासनाच्या निधीला मराठवाड्यात जाताना येतो.

प्रचार रथावर स्वार सत्ताधाऱ्यांना तर पूरग्रस्तांसाठी करावी लागणारी मदत म्हणजे सुवर्ण संधीच वाटली. त्यांच्या स्थानिक प्रतिनिधी आणि राज्यप्रमुख यांचा सुहास्य चेहरा त्या पूरग्रस्तांसाठी आधार देईल असेच काही तरी त्यांना वाटले असेल, पण काही नतद्रष्ट लोकांनी त्याला विरोध केला. यात लगेच काही सकारात्मक लोकांनी नेहेमी प्रमाणे या विवादात निकराची झुंज दिली, की लोकांना कोणी मदत केली ते समजायला नको का? पण ते हा तपशील सवयीप्रमाणे विसरले की ती मदत कोणी स्वतः च्या खिशातून केली नाही तर जे कोणी कर देतात त्यांच्या पैशातून दिली गेली. पण इतके मुद्देसूदपणे बोलण्याचा त्यांना वेळ थोडा असतो. आणखी खूप मुद्यांवर त्यांना त्यांचे एकट्याचेच "सत्य" असलेले मत नोंदवण्याचे असते. बाकी या पुरात जलसंपदा मंत्र्यांना समोर दिसलेली इतकी जलसंपदा बघून थोडे हसू आले असेल, तर त्यावर इतकी टीका करण्याचे काय कारण? पण लोक काय तर म्हणे संवेदनशीलता, गांभीर्य असल्या मृतप्राय तत्त्वांचे तुणतुणे वाजत बसले. 

सधन म्हणुन गणल्या जाणार्‍या सांगली-कोल्हापूर शहरात प्रत्येक गल्लीत एकतरी चारचाकी वाहन भेटेल पण सांगलीत पूरग्रस्त लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी तब्बल सात बोटी होत्या. ते पण खरे आहे म्हणा कोणाला वाटले असेल की शेकडो हेक्टर नदी पात्रातील थोडेसे अतिक्रमण आणि दिवसाला काही शेकडा ब्रास नियमबाह्य वाळू उपसा याला, नदी असा बेजबाबदार प्रतिसाद देईल. नदीला आम्ही मातेचा दर्जा देतो आणि माता म्हटले की आमचे सर्व पापे पोटात घेणे एवढेच तिचे कार्य आहे. पण या मातेने ते सर्व पापे एकदाच उलटून आम्हाला चांगलाच आशीर्वाद दिला. अगदी आम्हाला पेलायला देखील अवसान राहिले नाही इतका भरभरून. 




पूरग्रस्तांसाठी मदत देणे म्हणजे आपल्या घरातील जुन्यापुराण्या सामानाची विल्हेवाट लावणे असाच साक्षात्कार जणू काही लोकांना झाला असावा. त्यांनी आपल्या घराची झाडून सफाई केली आणि पंचगंगा, वारणा आणि कृष्णेच्या घाणीत भर घातली. बर काही महाभाग येणारी मदत स्वतः उतरून घेत आहे आणि त्या परत विकत आहे, अश्या बातम्या आल्या. पण आपण केलेली मदत त्या जिल्ह्यात तरी पोहोचली एवढे समाधान लोकांना लाभले ते काय थोडे आहे? तेथे काहींनी भाजीपाला इतक्या किमतीत विकला की घेणाऱ्याला उगाच आपण चंद्रावर वैगरे तर नाही ना याचा भास झाला. 

आता काही लोक पर्यावरण, वातावरण बद्द्ल या त्यांच्या मते खूप  अश्या गंभीर वगैरे  विषयांचे  ढोल बाडवतना दिसतील पण या नामशेष होत चालेल्या प्रजाती कडे कोणी लक्ष देण्याची गरज नाही. उगाच भीती दाखवतात हे लोक की पृथ्वीचे तापमान वाढत आहे, हवा प्रदूषित होत आहे, पिण्याचे पाणी संपत आहे. आता तुम्हीच सांगा आपल्या कोणाला आता या समस्या जाणवत आहे का? हा होतो कधीकधी २ दिवसांआड पाणी पुरवठा, होते उन्हाळ्यात थोडे जास्त तापमान बरं हे तापमान उन्हाळ्यात नाही वाढणार तरी कधी वाढेल? या लोकांना आता ही तापमानाची देखील "वाढ" पाहवत नाही, किती ही नाकारात्मकता? तिकडे कुठे स्वीडन नामक देशातील सोळा वर्ष्याच्या ग्रेटा थुंबर्ग नामक मुलगी म्हणे वातावरण बद्दल या असल्या कोणत्या तरी आभासी विषयावर आंदोलन करतेय. सोळावे वर्ष गंमतीजंमती करण्याचे असते निदान असे आम्हाला सांगण्यात येते, तर ही म्हणे आंदोलन करतेय, आता काय बोलणार आपण, असो. 

ज्यांच्या हाती राज्याची तिजोरी आहे, असे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना "देवाच्या नावावर द्या" अश्या पावित्र्यात मुंबई च्या रस्त्यावर मदत जमा करताना बघून आम्हाला धन्यता लाभली. तिकडे कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाचे दरवाजे उघडण्याच्या निर्णयावरून होत असलेला वाद बघून 'कर्नाटक' शब्दातील नाटक हे किती समर्पक प्रत्यय आहे ते दिसून आले. त्यात सुप्रसिद्ध हवाई पाहण्या सुरू झाल्या ; आम्हाला दहाव्या मजल्यावरून खालचे व्यवस्थित दिसत नाही. तिकडे आमच्या मंत्र्यांना हवाई पाहणीत काय दिसते? हे मला अजूनही उमगलेले कोडे आहे. म्हणुनच पी साईनाथ यांनी आता "पूर आवडे सर्वांना" असे एखादे पुस्तक लिहूनच टाकावे.

-ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ

Comments

Post a Comment