सैराट : भावनिक मुद्दातील सामाजिक कटुता…



        'चित्रपट समाजाचे चिञ प्रतिबिंबित करतात', असे मराठी चित्रपटांबद्दल तरी म्हणण्यास हरकत नसावी. जेमतेम एक लघुपट आणि एका चित्रपटाचा अनुभव, पण त्याहीपेक्षा सामाजिक पांढरपेशीपणाची दाहकता जवळुन अनुभवलेला दिग्दर्शक, ज्या चित्रपटास लाभतो त्यातुन सामाजिक प्रतिबिंब झळकणारच यात काही शंका नाही. नागराज पोपटराव मजुळे आणि चित्रपटास सामाजिक संदर्भ हे नाते ‘सैराट’ ने पुन्हा अधोरेखित केले.

       राजकारणाला असलेले जातीचे वलय, त्या राजकारणामुळे माणसाचे हरवलेले माणूसपण आणि त्यासोबत राजकीय वंशपरंपरेची पायाभरणी व्यवस्थित रेखाटली आहे. तसेच या सर्वाला असलेली समाजाची मु स्वीकृती राजकीय वास्तव आधोरेखित करते. प्रिन्स (नायिकेचा भाऊ) महाविद्यालयात प्राध्यापकास जी चपराक लगावतो, ती म्हणजे "ज्ञानसाधने वर मनगटशाहीने केलेली शिरजोरी" होय. राजकीय सत्तेतून निर्माण होणार्‍या मुजोरी चे प्रतिक म्हणजे हा प्रिन्स. 

             सैराट त्या समाजाचे प्रतिबिंब आहे, जेथे सामाजिक मान्यता पोटच्या मुली-मुला पेक्षा महत्वाची वाटते. जेथे स्त्रीयांना चूल आणि मुल या मापदंडात बंदीस्त केलेले आहे. त्यामुळेच नायिकेचे चौकटी बाहेरील बिनधास्त वागणे भाव खाऊन जातेस्कुटी वरील नायिकेला टॅक्टरवर बसुन आणि त्या टॅक्टर चालवणार्‍या नायिकेकडे अप्रूपपणे बघणाऱ्या स्त्रियांना दाखवून दिग्दर्शकाने समाजातील विरोधाभास अचूकपणे हेरला. तोच विरोधाभास महाविद्यालयात नायिका बुलेट घेऊन आल्यावर ती चालू होत नाही, तेव्हा नायिकेच्या मैत्रिणीला वाटणार्‍या लाजे मधून देखील व्यक्त होतो. 




        “पाटलाला तहान लागत नाही का?” असा संवाद साधणाऱ्या आजीबाई जातीय कटूतेला छेद देण्याचा संदेश देऊन जातात. पण त्याच ठिकाणी नायकाचा बाप जातीत स्वीकृती मिळण्यासाठी स्वतःच्या मुलासोबतचे नाते तोडण्यास तयार होतो, हे “वास्तव” दाखवण्यास देखील दिग्दर्शक विसरत नाही. जात पंचायत समोरील नायकाच्या वडीलांची हतबलता, जातीव्यवस्थेचे संस्थात्मकरण दर्शविणारे आहे. सामाजिक प्रतिष्ठा नामक अत्यंत संदिग्ध संकल्पने पोटी एक भाऊ आपल्या बहिणीचे जीवन उध्वस्त करतो, हे वास्तव अत्यंत अस्वस्थ करणारे आहे.
 
          या चित्रपटात बहुतांश कलाकार हे नवोदित आहे, त्यांनी कुठल्याही प्रकारचे अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेले नाही. हीच बाजू त्यांच्यासाठी जमेची ठरल्याचे चित्रपट बघितल्यावर लक्षात येते. 'पिस्तुल्या' या लघुपटात सूरज पवार, ‘फँड्री’ या पाहिल्या चित्रपटात सोमनाथ अवघडे आणि आता 'सैराट' मध्ये रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, तानाजी गळगुंडे, अरबाज शेख असे कलाकार नागराज मंजुळे यांनी अक्षरशः घडवले  आहेत.

          ‘सैराट’ ने भारतीय सिनेमाच्या मानगुटीवर बसलेल्या हॅपी एंडिंग रूपी भूताला बाजूला सारून, समाजाला आरसा दाखविला आहे. त्या आरशातील स्वतःचे हिंस्र रूप बघून काही लोक अस्वस्थ झाले तर काही रागावले कारण त्यांच्या वर्मावर बोट ठेवला गेला आहे. काहींनी सर्वांना हव्याहव्याश्या वाटणार्‍या, विशेषतः तरूण पिढीला आकर्षित करणार्‍या चित्रपटातील पहिल्या भागाला दोष देण्यास सुरुवात केली. तो दोष म्हणजे या चिञपटामूळे तरूण पिढी बिघडेल. हा अत्यंत बालीश तर्क आहे. कारण राजा हरिश्चंद्र सिनेमा बघून सगळेच सत्यवचनी बनले का? पण अश्या मांडणीला जातीय आयाम असल्याने ते किती गांभीर्याने घ्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

            चित्रपटाच्या शेवटी कोण काय घेऊन जाते हे महत्त्वाचे आहे. कोणी बाळ्याला लंगडा म्हणून नका, अशी निक्षून सांगणारी संवेदनशील आर्ची घेऊन जाईल. तर कोणी गुटखा खाऊ नकोस, असा सल्या ला आर्चीने दिलेला धमकी वजा सल्ला. कोणी प्रेम रूपी नितळ भावनेसाठी सर्वस्व पणाला लावण्यासाठी उर्जा. कोणी आपल्या भूतकाळातील चूकांना सुधारण्याची सदबुद्धी. छाया कदम यांनी साकारलेल्या खंबीर स्ञीपात्र सूमन प्रमाणे, प्रेमीयुगलांच्या पाठिमागे उभे राहण्याचा विचार काहीच्या मनात डोकावून जाईल. तर काहींना मैत्रीसाठी काहीही हा स्फूर्तिदायक विचार. 

             “फँन्ड्री” मध्ये शेवटी जब्याने जातीव्यवस्थे वर भिरकावलेला दगड असो,  की “सैराट” मध्ये ‘आर्ची आणि परश्या’ च्या ‘आकाश’ चे ‘जमिनी’वरील रक्तरंजित पावलाचे ठसे मनात विचाराचे काहूर उठवून देतात.

-ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ

Comments

  1. फार छान ब्लॉग! आरसा सगळ्यांसाठी सारखा नसतो पण, बरं का!

    ReplyDelete

Post a Comment