नारीशक्ती च्या नावाने चांगभलं…




        स्ञीला शक्तीच्या स्वरूपात पुजन्याची आपली महान भारतीय परंपरा आहे. त्यांच शक्तीच्या जोरावर खेळला जाणारा अस्सल खेळ म्हणजे कुस्ती, या खेळातच एका महिला खेळाडूने आपल्या शक्ती, कौशल्य, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर, ऑलिम्पिक च्या शेवटच्या 5-6 दिवसा पर्यंत कोऱ्या असलेल्या भारतीय पाटीवर पहिला अंक लिहिला. ती म्हणजे हरियाणाच्या मातीतील संयमी हिरकणी साक्षी मलिक. त्यापाठोपाठ तेलंगणाच्या आक्रमक रंणरागिणी पी. व्ही. सिंधू हिने देखील पदक निश्चित केले. (त्यांच्या राज्याचा उल्लेख त्यांचे यश सिमित करण्यासाठी नाही तर विशेष कारणास्तव करण्यात आला आहे.) त्यांचे यश इतके प्रखर आहे, की पी. व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक हे नाव रातोरात सर्वांच्या ओठी रुजले.

       साक्षीच्या विजयाने न्यायालयीन भांडणापासून, प्रतिबंधक औषधी प्रतिस्पर्धी पैलवानाच्या जेवणात कालवण्या पर्यंत, कुस्तीच्या नव अभिजात भारतीय डावांनी काळवंडलेल्या कुस्तीला कांस्याचा मुलामा चढवली गेला. एकंदरीत कुस्ती या खेळाला मागील ऑलिम्पिक पासून राहू-केतूचा सामना करावा लागत आहे. कसेबसे वजनी गटात फेरफार करून कुस्तीचे अस्तित्व ऑलिम्पिक मध्ये टिकून आहे. पण या अस्तित्वाच्या लढाईत अनेक पैलवान एकाच वजनी गटात खेळू लागल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आणि त्यातून नवीन आखाडा रंगला. या आखाड्यात धोबीपछाड पासून, एकेरी पट काढण्या पर्यंत सर्व डाव खेळून झाले. यामुळेच साक्षीने दिलेला चिवट लढा आणखीनच महत्त्वाचा ठरतो.

              साक्षीला नुकतेच हरियाणा सरकारने भरघोस रक्कमेचे पारितोषिक आणि सरकारी नोकरीची घोषणा केली आहे. ते स्तुती करण्या सारखेच आहे, पण ते तिला मागण्या अगोदर मिळावे म्हणजे झालं. तसेच विनिशा फोगट ने दिलेला जिकरीचा लढा देखील तितकाच महत्त्वाचा आहे, पण ती ऐनवेळी जखमी झाली आणि तिची पदकाची आशा संपुष्टात आली. हरियाणा राज्याने साक्षी, फोगट भगिनी तसेच बबिता कुमारी अशा अनेक  प्रतिभावान महिला खेळाडू दिल्या. हो त्याच हरियाणातुन, ज्या राज्याचे लिंग गुण्णोत्तर (0-6 वयोगटातील, 2011 जनगणनेनुसार) 834 आहे. जे संपूर्ण देशात कमी आहे. अगदी यामुळेच “बेटी बचाओ, बेटी पढाव” या अभियानाची सुरूवात याच राज्यातून करावी लागली. त्यामुळे या महिला खेळाडूच्या यशाला आणखी महत्त्व प्राप्त होते.

               भारताच्या नकाशात त्रिपुरा कुठे आहे? असे विचारले तर अनेकांना ग्लानी येईल. अशा राज्यातून दीपा करमाकर येते, भारतात ज्या खेळाचे अस्तित्वच दिसुन येत नाही. अशा जिम्नॅस्टिक्स मध्ये काही दशांश गुणांच्या फरकाने तिचा पराभव झाला, पण तिने करोडो मने जिंकली. जरी तिच्या गळ्यात पदक पडले नसले तरी, ती अनेकांच्या गळ्यातील ताईत बनली हे मात्र नक्की. तिच्यामुळे का होईना अनेक भारतीयांना या नवीन क्रीडा प्रकाराचा शोध लागला.

                 पुरूषसत्ताक समाजात स्त्रीयांना नेहमीच मिळालेले दुय्यमत्व हे आपल्या समाजाचे कटु सत्य आहे. आपणास ते स्वीकारावेच लागले, कारण आपल्या मानसिकतेने निर्माण केलेली ही समस्या आपल्यालाच निस्तारणे गरजेचे आहे. जर आपण वेळीच सावध होऊन कार्य केले नाही, तर अनेक साक्षी आणि सिंधू गावगाड्यात गुरफटून काळाच्या पडद्याआड गुडूप होऊन जातील आणि आपल्या इज्जतीचे लक्तरे आलंपिकच्या वेशीला टांगतील. आज सिंधू आणि साक्षी घराघरात पोहोचल्या, कारण त्यांच्या पालकांनी त्या मुली आहेत म्हणून त्यांचे हक्क हिरावून घेतले नाही. अनेक जण म्हणत असतील साक्षी आणि सिंधू काय मर्दा सारख्या खेळल्या, पण असे म्हणताना त्यांची पुरूषी मानसिकता लपत नाही.
             
              विशेष म्हणजे भारतीय खेळाडू वर टीका करतानी, ज्यांनी आपल्या अकलेची “शोभा” दाखवली त्यांना स्ञीयांनीच आसमंत दाखवले, हा देखील दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. सिंधू आणि साक्षी ज्या वेळी जिवाच्या आकांताने रिओ मध्ये पदकासाठी लढत होत्या, त्या वेळी आपल्या देशातील ‘नेटीझन्स’ कोण अधिक जास्त वेळा त्यांची "जात" शोधते या शर्यतीत मश्गुल होते. या जात रुपी अफूच्या गोळीने आपल्या समाजव्यवस्थेला मद्यधुंद केले आहे, याचेच हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. आपल्याकडे कोणत्याही व्यक्तींच्या जाती बद्द्लच हे कुतूहल कधी नष्ट होईल? याचा शोध घेण्यासाठी आपणास समाज म्हणुन अंतर्मुख होण्याशिवाय गत्यंतर नाही.

            याच ऑलिम्पिक मध्ये आणखी एक अद्वितीय गोष्ट घडली, एका पैलवानाला दिल्ली ते रिओ अशी एकुण 8747 मैल अंतराची ‘अडथळा’ शर्यत खेळावी लागली. त्यात तो हरला आणि देशाने एक पदक गमावले, या सर्व प्रकरणास कोणाचा ‘बालिश’ अट्टाहास कारणीभूत आहे, याचा शोध घेणे अगत्याचे आहे. नरसिंग यादव  प्रकरणात दोषी कोण आहे? हे संपूर्ण देशाचा समोर येणे गरजेचे आहे. नाही तर क्रीडा संस्कृतीला न शोभणाऱ्या अशा गोष्टी घडतंच राहतील.

             सिंधूचा आक्रमक बाणा आणि साक्षीचा संयमी स्वभाव आम्हाला विचार करायला भाग पाडतो आहे. आपणास वेळीच सुधारण्याची गरज आहे. आपल्या मुलींना निवडीचे स्वातंत्र्य देण्याची गरज आहे. हे स्वातंत्र्य  देताना आपण त्यांच्यावर उपकार करतोय, या अविर्भावात राहण्यात काही एक हशील नाही. कारण तो त्यांचा हक्क आहे. सिंधू आणि साक्षीच्या विजयाने जसा संपूर्ण देश श्रावणात दिवाळी साजरी करतोय, त्याचं प्रमाणे घरात मुलीच्या जन्मानंतर “जिलेबी” ऐवजी “पेढे” वाटण्यास सुरूवात करण्याची गरज आहे.

            काही लोक खेळाडूंवर होणार्‍या बक्षीस रुपी पैश्याचा वर्षावावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे, की जे खेळाडू स्वकर्तुत्वावर पदक मिळवून देतात, त्यांना प्रोत्साहन पर राशी दिल्यास ते त्याचा उपयोग भावी तयारी साठी करू शकतात. आपणास खरच पदकांची संख्या वाढवावी असे वाटत असेल तर आपणास पायाभूत सुविधांची चणचण दूर करणे अगत्याचे, हा सल्ला देखील परिस्थिती सुसंगत आहे. मने जिंकण्यात हातखंडा असणाऱ्या, आम्हा भारतीयांना पदकांची भूरळ कधी पडते देव जाणे. जर मने जिंकण्याची “मन”तालीका असते तर आपण अग्रस्थानी असलो असतो हे मात्र नक्की.

           यंदाच्या ऑलिम्पिकचे वैशिष्ट्य म्हणजे महिला खेळाडूच्या कामगिरीची विशेष चर्चा झाली. अगदी दीपा करमाकर, सिंधू, साक्षी पासून ललिता बाबर पर्यंत. ही नारीशक्ती अशीच वृध्दिगत होवो आणि आम्हा सर्व भारतीयांना गर्वाने मान ताठ करण्याची संधी अनेकदा मिळो हीच अपेक्षा…

@ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ

Comments

  1. Chan lihit aahes... would like read more such articles.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Shravan, मी नक्की प्रयत्न करेल आणखी लिहण्याचा ☺

      Delete

Post a Comment